अपवहन खळगे :
वाळवंटी प्रदेशात वाऱ्याच्या आघाताने खडकाचे तुकडे होऊन तसेच खड्डय़ाच्या जागी कधी पाणी साचून खडक कुजून कमकुवत होतात. हे तुकडे वाऱ्याबरोबर वाहत जाऊन तेथे खड्डे तयार होतात. या खळग्यांनाच ‘अपवहन खळगे’ असे म्हणतात. अशी उदाहरणे सहारा, आफ्रिकेतील कलहारी, आशियातील मंगोलिया, पश्चिम ऑस्ट्रेलिया इ. वाळवंटी प्रदेशात अपवहन खळगे आहेत.
भूछत्र खडक :
वारा वाहत असताना वाऱ्याबरोबर वाळूचे अनेक कण वाहत असतात. अशा वेळी वाऱ्याच्या मार्गात एखादा शिलाखंड आल्यास व वाऱ्याची दिशा सतत बदलत राहिल्यास शिलाखंडाच्या पायथ्यापासून एक ते दीड मीटर उंचावर असलेल्या भागाची चोहोबाजूंनी घर्षणाने झीज होते. त्याला छत्रीसारखा आकार प्राप्त होतो. अशा वैशिष्टय़पूर्ण शिलाखंडाच्या आकाराला भूछत्र खडक असे म्हणतात. अशी उदाहरणे सहारा व इराणच्या वाळवंटात मोठय़ा प्रमाणात आहेत.
झ्युजेन :
वाळवंटी प्रदेशात क्षितिजसमांतर कठीण व मृदू खडकांचे स्तर एकमेकांवर आडवे असल्यास व त्यात जोड किंवा संधी असल्यास ऊन, वारा आणि जास्तीत जास्त तापमान व कमीत कमी तापमान यामुळे जोड रुंदावत जातात. अशा वेळी कठीण खडकाची फारशी झीज होत नाही. जो आकार प्राप्त होतो, त्यास झ्युजेन असे म्हणतात. झ्युजेनची उंची साधारण ४० ते ४५ मीटपर्यंत असते. अशी भूरूपे अरेबिया, इजिप्त व लिबियाच्या वाळवंटी प्रदेशात आढळतात.
यारदांग :
वाळवंटात ज्या ठिकाणी कठीण आणि मृदू खडक हे लंबवत स्थितीत वाऱ्याच्या दिशेला समांतर व एकानंतर एक असतील किंवा एकमेकांना समांतर असतील तर अशा वेळी वाऱ्याच्या खननकार्यामुळे मृदू खडकाची जास्तीत जास्त झीज होऊन मृदू खडक किंवा स्तर नाहीसा होऊन यारदांग तयार होतात. अशी यारदांगे मध्य आशिया खंडातील गोबीच्या वाळवंटात, दक्षिण अमेरिकेतील अटाकामाच्या वाळवंटात आढळतात.
द्वीपगिरी :
वाळवंटी प्रदेशात एखादा चबुतरा असल्यास चबुतऱ्याच्या आजूबाजूचा भाग वाऱ्याच्या खननकार्यामुळे झिजून आतील कठीण खडकाचा उंच भाग तसाच शिल्लक राहतो. हा भाग घुमटाकार होत जाऊन वाळूच्या टेकडीसारखा दिसू लागतो. त्यांची फारशी झीज होत नाही. हे उंच व घुमटाकार आकार वाळूच्या टेकडय़ांसारखे असतात. यांनाच ‘द्वीपगिरी’ असे म्हणतात.
वाळवंटी प्रदेशात वारा आणि काही प्रमाणात पाऊस यांच्या संयुक्त कार्यामुळे द्वीपगिरीची निर्मिती होते. कलहारी वाळवंटात, नायजेरियाच्या वाळंवटात आणि ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटात द्वीपगिरीची उदाहरणे आढळतात. द्वीपगिरी म्हणजे तीव्र उताराच्या टेकडय़ा होय.
मेसा व बुटे :
वाळवंटी प्रदेशात कठीण व मृदू खडकांचे थर एकमेकांवर आणि आडव्या दिशेने समांतर असतील तर अशा वेळी वाऱ्याच्या घर्षणामुळे मृदू खडकांची झीज जास्त प्रमाणात होऊन तिथे चौकोनी टेबलासारखा भाग दिसतो. त्यास मेसा असे म्हणतात. मेसाच्या बाजू तीव्र उताराच्या असतात. मेसा या टेबलासारख्या भागावर सतत झीज होत राहिल्यास त्याचा आकार लहान ठोकळ्यासारखा दिसतो. त्यास बुटे असे म्हणतात.
No comments:
Post a Comment